गुहेतलं गूढ-Marathi Ghost | Jungle Marathi Story For Kids

गेले दहा दिवस वसंतवनात एकाच गोष्टीची चर्चा होत होती आणि ती म्हणजे गुहेतल्या गूढ कोड्यांची. वसंतवनातले सगळे प्राणी हैराण झाले होते. सिंहमहाराजांना तर रात्र-रात्र झोप येत नव्हती, पण करणार काय? गुहेतल्या त्या विचित्र कोड्यांची उत्तरं कुणालाच देता येत नव्हती… मार्ग सापडत नव्हता… राज्यात हुशार प्राणी नव्हते असं नव्हतं… पण जे काही दहा-बारा हुशार प्राणी होते… जे सतत महाराजांना राजकारणात सल्ला देत, ते एका दूरच्या सहलीला गेले होते. चलाख कोल्हा त्यांचं नेतृत्व करत होता. त्या सर्वांना परत यायला अवकाश होता आणि शेजारच्या शिशिरवनातल्या धूर्त राजानं नेमकी हीच वेळ साधली होती.

त्याचं असं झालं होतं, वसंतवन आणि शिशिरवन हे अगदी जवळजवळ होते. वसंतवनात नेहमी जणू वसंत फुललेला असायचा. म्हणजे फळं, फुलं भरपूर असायची… प्राण्यांना काहीही कमी पडायचं नाही….. थोडक्यात काय तर सुबत्ता होती म्हणा ना.. या जंगलचा राजाही शांत, शिस्तप्रिय आणि प्रजेला प्रोत्साहन देणारा होता. याउलट शिशिरखनातली गोष्ट. तिथे नेहमीच पानगळ. म्हणजे असं की, जंगलात सतत दुष्काळ… कुठली ना कुठली तरी साथ सतत आलेली. त्यामुळे कुणीच सुरखी नव्हतं. सतत तक्रारी. या तक्रारीला कंटाळूनच त्या वनातले सिंहमहाराज आक्रमक बनले होते. शेजारच्या वसंतवनावर हल्ला करायचं त्यांनी ठरवलं, पण तेही जरा अवघड होतं. कारण वसंतवनातील प्राण्यांची एकी होती… शिवाय त्यांची सेनाही चांगली तगडी होती… मग एक दिवस एका दुष्ट तरसानं महाराजांना एक दुष्ट कल्पना सांगितली. वसंतवनातले हुशार प्राणी एका दूरच्या सफरीवर जाणार आहेत, याचा सुगावा त्यांना लागलाच होता. तेव्हा हे प्राणी सफरीवर जाताच ही गोष्ट करायचं ठरलं.

त्याप्रमाणे दहा दिवसांपूर्वी हा दुष्ट प्राणी वसंतवनात आला. आला तो सरळ सिंहमहाराजांकडे गेला आणि शिशिरवनातील आपल्या राजाचा खलिता त्यानं भर दरबारात दिला. त्यात लिहिलं होतं की, “आमच्या आणि आपल्या राज्याच्या सीमेवर जी एक किलोमीटर लांबीची गुहा आहे, त्यात माझ्या दूतानं दोन विचित्र कोडी विचित्र अटींसह ठेवली आहेत. तुमच्या राज्यातल्या कुणाही हुशार प्राण्यानं ती सोडवून दाखवावीत. या कोड्यांची उत्तरं जर पंधरा दिवसांत मिळाली नाहीत, तर वसंतवन सोडून आपण निघून जावं किंवा गुलाम म्हणून राहावं… अन्यथा माझे सारे सैनिक आपल्या राज्यावर हल्ला करतील.”

विचित्र कोडी तरी कोणती आहेत ती पाहावीत म्हणून तरसाबरोबर सारेजण गुहेत गेले. तिथं एक विचित्र ढीग त्यांना दिसला. एका बाजूला दहा-पंधरा लाल भोपळे… भोपळे चांगलेच मोठे होते. मोठ्या घागरीएवढा एकेक भोपळा. त्याला लागून काटेसावरीचा कापूस. त्याला लागून सुरेख रसरशीत मोठी अशी रसाळ भरताची वांगी. वांगी पण चांगली शंभरएक असतील. लांबून पाहिलं तर तो एक अखंड ढीग वाटायचा.

त्या ढिगासमोर उभा राहून तरस बोलू लागला, “इथं हे तीन विविध प्रकारचे ढीग पण एकत्र असे आहेत. केवळ तीन मिनिटात हे ढीग वेगळे करायचे आहेत. हो, पण यासाठी महत्त्वाची अट म्हणजे या ढिगातल्या कशालाही हात लावायचा नाही. काठी किंवा कुठल्या वस्तूनं त्याला ढकलायचं नाही आणि हे सारं करायचंय ते या ढिगापासून एक मीटर अंतरावर ही जी रेघ मारली आहे त्या रेघेच्या बाहेर राहून… दुसरं कोडं असं की, तुमच्या जंगलातल्या कोणत्याही एक ते दोन वर्षांच्या प्राण्यानं दहा ते पंधरा वर्षांचा वृक्ष उपटायचा आणि गुहेच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत खांद्यावरून वाहून न्यायचा… ही कोडी पंधरा दिवसांत सुटली नाहीत, तर हे जंगल सोडून जावं लागेल किंवा आमच्या राजाची गुलामगिरी पत्करावी लागेल.” असं म्हणून तरस निघून गेला.

तरस निघून गेल्यावर वसंतवनात शोककळा पसरली. दोन वर्षांच्या प्राण्यानं दहा वर्षांचं जुनं झाड एक किलोमीटर कसं काय वाहून न्यायचं याचाच ते विचार करू लागले. ते काही त्यांना उलगडेना… त्या विचारात ते इतके गुरफटून गेले की, ते ढीग वेगळी युक्ती वापरून वेगळे करता कसे येतील हे त्यांच्या लक्षातच येईना.

सिंहमहाराज शांत चित्तानं थोडा विचार करत बसले. पहिल्यांदा ढीग कसे वेगळे करावेत याचा विचार ते करत होते… तसे काठीनं किंवा कशानं तरी ढोसून ढीग वेगळे करता आले असते, पण अट मोठी विचित्र होती. कशानंही स्पर्श न करता ढीग वेगळे करायचे होते. तेही तीन मिनिटांत. कसं शक्य आहे … ते असा विचार करत असतानाच वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली आणि त्या झुळुकीबरोबर जंगलातल्या रानटी झाडाचा कापूस महाराजांपुढे येऊन पडला. तो बघताच ढीग वेगळे करायची युक्ती महाराजांना सापडली. त्यांनी हत्तीला बोलावलं आणि त्याच्या कानात ती युक्ती सांगितली. हत्ती रखूश झाला. डुलत डुलत गुहेत गेला. तरस तिथं बसलेलाच होता. येणाऱ्या जाणाऱ्या प्राण्यांना तो चिडवत होता. कारण प्राणी येत. ढीग बघत… त्या भोवती एक चक्कर मारत आणि निघून जात. उत्तर कुणालाच सापडत नसे. हत्ती तिथं आल्यावर तरसानं त्यालाही चिडवलं. पण हत्ती गप्प होता. तो म्हणाला की, ‘मी करून दाखवतो तीन ढीग वेगवेगळे’. तरस कुत्सितपणे हसला, पण त्या हसण्याकडे दुर्लक्ष करून हत्ती रेषेवर उभा राहिला आणि सोंडेतून त्यानं जोरदार हवा बाहेर टाकली, त्याबरोबर ढिगाच्या मधला कापूस उडून पलिकडं गेला आणि आपोआपच तीन ढीग वेगळे झाले. तरस खाली मान घालून निघून गेला.

वसंतवनात जरा आनंद झाला, पण दुसरं कोडं सोडवायचं कसं कुणी म्हणे, याचं उत्तर त्यांच्यापाशीपण नसेल. करून दाखवा म्हणावं पण महाराज या गोष्टीला तयार नव्हते. आपण असं म्हटलं आणि चुकून त्यांनी करून दाखवलं तर? त्यापेक्षा आपणच विचार करू.

इकडे शिशिरवनात आनंदोत्सव सुरू होता. दोन वर्षांचा प्राणी दहा वर्षांचा वृक्ष कसा उपटून वाहून नेणार? शक्यच नव्हतं.ते ते हरणार होते आणि…इतक्यात वसंतवनाकडून आला की निरोप, आमच्या जंगलातला छोटा ससा अठरा वर्षांचा वटवृक्ष खांद्यावर घेऊन उद्या येत आहे… कसं शक्य आहे हे?… सगळे विचार करू लागले. आता आश्चर्यचकित व्हायची वेळ आली होती शिशिरखनातल्या प्राण्यांवर.

पण हे घडणार होतं कसं? त्याचं असं झालं की, कोडं सांगितलेल्या दिवशीच सिंह महाराजांनी आपल्या गुप्तहेर पोपटाला आपले हुशार प्राणी ज्या भागात गेले होते तिकडे पाठवलं आणि कोल्होबांना लगेच बोलवलंय म्हणून निरोप दिला. कोल्होबांनी ते आल्याबरोबर ऐकलं आणि म्हणाले, यात काही अवघड नाही. आपला दोन वर्षांचा छोटा ससुल्या अठरा वर्षांचा वृक्ष वाहून नेईल… पाठवा निरोप शिशिरवनात. महाराजांसकट सर्वांना कोडं पडलं, पण कोल्होबांनी सांगितलंय, म्हणजे होणारच म्हणून ते गप्प राहिले… दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी जमा झाले. शिशिरवनातले प्राणीसुध्दा मोठ्या संख्येनं आले होते… आणि क्षणार्धात अठरा वर्षांचा वटवृक्ष खांद्यावर टाकून ससुल्या ऐटीत निघाला. शिशिरवनातल्या राजापुढं त्यांनं तो ठेवला. त्या महाराजांना काही कळेचना. वृक्ष तर जुनाट वाटत होता. फांद्या पारंब्यांवरून त्याचं वयही भरपूर असावं असं वाटत होतं. पण मग तो एवढा छोटा कसा?

अधिक अंधारात न ठेवता कोल्होबा पुढे आले आणि म्हणाले, “ही वृक्ष वाढवण्याची जपानी कला आहे. याला ‘बोनसाय’ म्हणतात. झाडाची मुळं, पानं, फांद्या कापून त्याची वाढ अशी खुंटवण्यात येते, पण तरीही याचा जूनपणा जाणवतो. एवढंच काय पण फळं देणाऱ्या झाडांना छोटी छोटी फळंही लागतात… वडाच्या या एवढ्याशा झाडाचं वय अठरा असेल, यात आश्चर्य काय?”

शिशिरवनातला राजा हरला होता. त्यानं वसंतवनातल्या राजाची क्षमा मागितली. आपण मैत्रीनं राहू अशी विनवणी केली. वनाचा कारभार आदर्श कसा करावा याचं तंत्र त्याला शिकवण्याची विनंती केली. साहजिकच वसंतवनाच्या राजानं मैत्रीचा हात पुढं केला…. सगळ्या प्राण्यांनी त्यांचा जयजयकार केला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.