एक मोठं जंगल होतं. त्या जंगलात वड, पिंपळ, निंब, आंबा,चिंच, साग, खैर, चंदन असे कितीतरी प्रकारचे वृक्ष होते. हे वृक्ष खूप जवळजवळ होते. अशी दाट झाडी असली की अशा जंगलाला घनदाट जंगल असं म्हणतात.जशी झाडांमध्ये विविधता होती, तशी त्या जंगलात प्राण्यांमध्येही विविधता होती. हत्ती, वाघ, सिंह, जिराफ, लांडगा, कोल्हा, खोकड, बोकड, माकड असे विविध प्राणी तिथं आनंदानं राहात. अरे हो! आणखी एक सांगायचं राहिलं बरं का…त्या जंगलात चिमणी, कावळा, बगळा, भारद्वाज, कबुतर, बुलबुल, बहिरी ससाणा, घार, गरुड, गिधाड, घुबड असे लहान मोठे पक्षी पण मोठ्या मजेत राहात होते.
अशा या आनंदवनात एकदा मोठं वादळ आलं. या वादळात अनेक झाडं पडली काही झाडांच्या फांद्या तुटून खाली पडल्या. अशाच एका झाडाच्यामोठ्या फांदीवर एका चिमणा-चिमणीनं घरटं बांधलं होतं. काडी काडी जमवून त्यांनी सुरेख घरटं तयार केलं होतं …पण वादळात नेमकी तीच फांदी तुटून खाली पडली. घरट्यात चिमणीची दोन अंडी होती. फांदी तुटल्यामुळं घरटं खाली पडलं. घरट्यातली अंडी जमिनीवर पडून फुटली. चिमणीला वाईट वाटलं.चिमण्याला ती म्हणालीसुध्दा की, तरी मी तुम्हाला सांगितलं होतं की, या झाडाची ही फांदी चांगली मजबूत नाही. आपण दुसऱ्या फांदीवर घरटं बांधू,पण त्यावेळेस तुम्ही माझं ऐकलं नाहीत. चिमणी रडत होती. चिमण्यालाही वाईट वाटलं, पण चिमणीचं काही ऐकण्याच्या स्थितीत तो नव्हताच. त्याला झाडाचा भयंकर राग आला होता. रडणाऱ्या चिमणीला तिथंच टाकून तो वेगानं निघाला
पहिल्यांदा तो हत्तीकडं गेला. त्याला म्हणाला, “हत्तीदादा… हत्तीदादा..!झाडं फार वाईट आहेत. आमची घरटी नीट सांभाळत नाहीत.. वादळ वाऱ्यात त्यांचं नीट रक्षण करत नाहीत… आमची घरटी पाडून टाकतात… मग घरट्यातली अंडी फुटतात… पिलं मरतात… झाडं आम्हाला त्रास देतात. म्हणून मी ठरवलंय की जंगलातली सारी झाडं पाडून टाकायची. मला तू मदत कर. तू ताकदवान आहेस, शक्तीवान आहेस. तू मनात आणलंस तर भराभर झाडं पाडू शकशील…पण हत्तीदादा या गोष्टीला काही तयार झाला नाही. धडक देऊन झाडं पाडायला किंवा सोंडेत धरून मुळासकट झाडं उपटायला त्याने पूर्णपणे नकार दिला. उलट चिमण्याला समजावण्याचा त्यानं प्रयत्न केला, पण चिमणा काही ऐकायला मुळी तयारच नव्हता. झाडांचा त्याला खूप राग आला होता… हत्ती नाही मदत करत म्हटल्यावर मग चिमणा गेंड्याकडं गेला. गेंड्यानंही त्याला या बाबतीत मदत करायचं नाकारलं. रानगवा… बैल… एकेक प्राण्यांना विचारत तो असं. जवळजवळ दोन तास हिंडला, पण एकही प्राणी याबाबतीत त्याला मदत करायला तयार होईना. काही पक्ष्यांनाही चिमण्यानं विचारलं, पण तेही मदत करायला तयार नव्हते. एक कावळा मात्र या गोष्टीला तयार झाला. फार पूर्वीपासून झाडांवर त्याचाही राग होता.
दोघांनी मिळून थोडा विचार केला. मोठ्ठी झाडं तर आपण पाडू शकत नाही… आपण अंसं करू या, छोटी छोटी रोपं उपटून टाकू. म्हणजे मग त्यांची मोठी झाडं होणारच नाहीत. ही मोठी झाडं म्हातारी झाली की पडून जातील… मग आपोआप जंगल राहणारच नाही. आपल्या या कल्पनेवर दोघंही खूष झाले आणि लागले की कामाला. बरीच छोटी छोटी रोपं त्यांनी उपटून टाकली. काही झाडांच्या छोट्या बिया जमिनीवर पडल्या होत्या, त्या त्यांनी गिळून टाकल्या.
संध्याकाळ झाली तरीही यांचं काम आपलं चालूच होतं. इतक्यात त्यांना चाहूल लागली. कुणीतरी येतंय. दिवसभर काम करून खरं तर ते अगदी थकून गेले होते, पण शत्रूची चाहूल लागताच ते सावध झाले. तशा त्या संधीप्रकाशातही बहिरी ससाणा आपल्याकडं झेपावतोय हे एकाक्ष कावळ्याला दिसलं. त्यानं तसं चिमण्याला सांगितलं आणि त्यानं झडप घालायच्या आधीचशेजारच्या दाट झुडपात ते शिरले. बहिरी ससाणा निघून गेला. नशीब चांगलं म्हणून कावळा आणि चिमणा वाचले…
रात्री उशिरा चिमणा घरी आला. कावळाही आपल्या घरट्यात परतला. दिवसभर रोपं उपटल्यामुळे चिमण्याची चोच खूप दुखत होती. बिया गिळल्यामुळं पोटंही दुखत होतं. झुडपात शिरताना पंखही दुखावले होते. डोळे मिटून आणिपंखात चोच खुपसून तो गप्प बसला. त्याचा झाडे-अर्थात रोपं उपटण्याचा वेडेपणा अनेक प्राण्यांनी, पक्ष्यांनी पाहिला होता. त्यापैकी त्याचे जे जवळचे मित्र-सुतारपक्षी, सुगरण आणि पोपट, ते त्याला भेटायला आले.
सुगरणीला झाडपाल्याची बरीच माहिती होती. तिनं पोपटाच्या मदतीनं काही झाडांची, झुडपांची पानं तोडून आणली. त्याचा रस काढून दुखावलेल्या पंखांना आणि चोचीला लावला. पोटातही घ्यायला दिला. थोड्याच वेळात चिमण्याचं दुःख कमी झालं. सुगरण त्याला म्हणाली, “वेडा रे वेडा! रोपं कुणी उपटून टाकतं का छोटी रोपं मोठी होतात. त्याची मग मोठी झाडं होतात. अरे झाडं आहेत म्हणून आपण आहोत. झाडंच नसतील तर आपण घरटी कुठं बांधणार आपल्याला गोड गोड फळं कशी मिळणार वेड्या… झाडांच्या पानांच्या छत्रीमुळं तर पावसापासून आपलं रक्षण होतं. अरे…आम्ही तर बाभळीच्या काटेरी झाडावर आमचं घरटं बांधतो, त्यामुळे शत्रूपासून आमच्या घरट्याचं रक्षण होतं आणि काय रे ही झाडं-झुडपं नसती, तर तुला आज लेप कशाचा लावला असता झुडपामुळेच तू आज वाचलास ना.. नाहीतर त्या बहिरी ससाण्यानं केव्हाच गट्टम करून टाकलं असतं.”
सुगरणीचं हे सारं बोलणं ऐकल्यावर चिमण्याला, आपण केलेल्या कृतीचा पश्चात्ताप झाला. सगळे जेव्हा गाढ झोपी गेले तेव्हा हा उठला आणि सकाळी, दुपारी जी रोपं त्यांनी उपटून टाकली होती ती एकेक चोचीत धरून तो नदीकिनारी जी दलदल होती त्या दलदलीत नेऊन लावू लागला…
आज तिथं दाट झाडी आहे. सारेजण त्या भागाला चिमणावन म्हणूनच ओळखतात.