पाचूवनात सगळीकडे आनंदीआनंद होता. याला कारणं तशी अनेक होती. एक तर पाचूवन’ नेहमी हिरवंगार असे. फळाफुलांनी लदबदलेलं असे. उंच झाडी, दाट झाडी, विरळ गवत, दाट गवत, मोकळं मैदान, मोठ्ठा तलाव… एक ना दोन… प्राण्यांना उपयुक्त अशा कितीतरी गोष्टी त्या वना होत्या. त्यामुळे छोटे प्राणी कोवळं कोवळं गवत खाऊन दाट गवतात अगदी मजेत खेळायचे. त्यांना हिंस्र प्राण्यांपासून अजिबात भय वाटायचं नाही. कारण दाट गवतात ते मुळी कुणाला दिसायचेच नाहीत. हिंस्र प्राणीदेखील मजेत असायचे,कारण इथल्या सुंदर आणि कोवळ्या गवतांमुळं शेजारच्या जंगलातले प्राणी रात्री गुपचुप लपत छपत या जंगलात येत… गवत खाण्यासाठी असे प्राणी आले की पाचूवनातले दबा धरून बसलेले हिंस्र प्राणी त्यांची आयतीच शिकार करत आणि आपली उपजीविका करत.पाचूवनातले हिंस्र पशू आपल्याच वनातल्या प्राण्यांची शिकार करत नसत…साहजिकच पाचूवनांत नेहमी आनंद असे.
पाचूवनाचे सिंहमहाराज तसे साधेभोळे आणि दयाळू होते. प्राण्यांमध्ये भांडण-तंटे नसल्यानं कुणाचं भांडण सोडवणं किंवा न्यायनिवाडा करणं असे प्रसंग फारच कमी येत… पण एक दिवस एक विचित्र खटला सिंहमहाराजांसमोर सुनावणीला आला… त्याचं असं झालं होतं…
सूर्य मावळतीकडे चालला होता. पक्षी आपल्या घरट्यांकडं परतत होते.महाराजही आपल्या गुहेच्या बाहेर छाव्यांबरोबर खेळत होते… प्रधानजी वाघोबांची डरकाळी आणि काही प्राण्यांचे आवाज ऐकून ते चक्रावून गेले. प्राण्यांचा एवढा गलका कसला? असा विचार ते करत होते… एवढ्यात वाघोबा आणि काही सैनिक प्राण्यांनी एका कोल्ह्याला आणि हत्तीला महाराजांपुढं सादर केलं. कोल्हा आणि हत्ती … दोघेही ‘मी सशाला मारलं नाही तूच मारलंस’ असा एकमेकांवर आरोप करत होते… महाराजांनी दोघांना गप्प बसायला सांगितलं….वाघोबांना विचारलं की, हा काय प्रकार आहे ?
वाघोबा म्हणाले की, ‘या प्रकाराबद्दल मला तशी माहिती नाही. मी सहज या बाजूनं फिरत होतो तर तरस, काळवीट, गिधाड वगैरे पशु-पक्षी या दोघांना आपल्याकडं घेऊन येत होते. कोल्हा आणि हत्ती त्यांना तसे आवरत नव्हते म्हणून मी बरोबर आलो’….मग सिंहमहाराजांनी कोल्होबाला विचारलं…. कोल्हा सांगू लागला….
“महाराज आता मी म्हातारा झालो. सहज म्हणून मी डोंगरावर फिरायला चाललो होतो…. इतक्यात मला सशाची किंकाळी ऐकू आली. मी धावत जाऊन बधतो, तर काय तो ससा मेला होता…. आणि हा हत्ती त्याच्याजवळ उभा होता. मी त्याला म्हटलं की, तूच मारलंस ना माझ्या मित्राच्या मुलाला? तर तो माझ्याशीच भांडायला लागला आणि उलट म्हणायला लागला की, म्हणे तूच मारलंस त्याला. महाराज एकतर हा ससा माझ्या खास मित्राचा मुलगा. मित्राच्याच मुलाला कुणी मारील काय? दुसरी गोष्ट या हत्तीचं आणि माझ्या मित्राचं त्यांच्या वडिलांपासून भांडण होतं आणि अजूनही आहे. दोघंही एकमेकांकडं कधी जात नाहीत किंवा कधी बोलतही नाहीत. त्याचाच सूड उगवला महाराज यानं… मी सशाच्या पिल्लाची किंकाळी ऐकून आलो तेव्हा हा तिथं जवळच उभा होता. मी दिसताच लागला की भांडायला. म्हणून मी ओरडून सगळ्या प्राण्यांना बोलावलं. माझ्या सुदैवानं त्या भागात गस्तीवर असणारे हे पशु-पक्षी माझ्या मदतीला धावून आले…. मी काही बोलायला लागलो की, हा हत्ती इतर काही बोलायचाच नाही. ‘तूच सशाला मारलंस’ एवढंच म्हणायचा…. शेवटी मीच म्हणालो की, चला आपण महाराजांकडे जाऊया, तेच याचा निवाडा करतील. तर हा म्हणे, मी का महाराजांकडं येऊ? मी काही या सशाला मारलेलं नाही…. मी काही येणार नाही.’ शेवटी सगळ्यांनी जबरदस्ती केली तेव्हा हा यायला निघाला. महाराज त्याचा हा दुष्टावा बघून मला तर वाटेत चक्करच आली…. पण कसातरी मी सावरलो. शिवाय आपल्याला माहीतच आहे महाराज की,आपल्या जंगलातील हिंम प्राणी आपल्याच वनातील छोट्या प्राण्यांची सहसा शिकार करत नाहीत…. महाराज माझ्या मित्राच्याच मुलाला मी कशाला मारू?… महाराज मला एवढंच सांगायचंय.”
त्याचं सांगणं संपल्यावर महाराजांनी मग हत्तीला विचारलं, तुला काही सांगायचंय का? पण तो म्हणे, ” महाराज मी या सशाला मारलं नाही. मला याचा काय उपयोग?… मी शाकाहारी प्राणी… महाराज मी याला खरंच मारलं नाही… मला सोडून द्या. पण, हत्तीच्या या स्पष्टीकरणानं महाराजांचं समाधान झालं नाही. त्याला त्यांनी आणखी काही प्रश्न विचारले. हत्तीनं त्याची उत्तरं दिली….
“तू सशाला ठार केलंस का?”
“नाही महाराज.”
“कोल्ह्यानं सशाला ठार केलं का?”
“होय महाराज.“
“सशाला ठार करताना तू कोल्ह्याला बघितलंस?”
“नाही महाराज.”
“त्यानं मारल्याचा काही पुरावा तुझ्याकडे आहे?”
“नाही महाराज.”
“ससा मेला तेव्हा तू कुठे होतास?”
“सांगता येत नाही.”
“सशाच्या प्रेताजवळ प्रथम कोण आलं?”
“मीच महाराज.”
“सशाच्या घराण्याशी तुमचं वैर आहे ही गोष्ट खरी का?”
“होय महाराज.”
“मेलेला ससा कोल्होबाच्या मित्राचा मुलगा आहे, हे खरं का?”
“होय! हे खरं आहे.”
“कोल्हा तिथं आल्यावर तू त्याच्याशी भांडलास का?”
“होय महाराज.”
“न्यायनिवाड्यासाठी इथं यायला तू नकार दिला होतास का?”
“होय महाराज.”
हत्तीच्या या संपूर्ण जबानीवरून हत्तीच दोषी असल्याचं महाराजांचं मत बनलं आणि कोल्ह्याला त्यांनी सोडून दिलं. अंतिम निकाल दुसऱ्या दिवशी द्यायचं ठरवून हत्तीला त्यांनी वाघोबाच्या ताब्यात दिलं. सशाच्या पिल्लाचं प्रेत त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिलं. कोल्हा आपल्या मित्राच्या सांत्वनाला गेला… सगळे प्राणी निघून गेले. हत्तीला एका गुहेत कोंडून ठेवण्यात आले व बाहेर कडक पहारा बसवला.
वाघोबा आपल्या गुहेकडे चालले होते. सिंहमहाराजांनी दिलेला न्याय त्यांना तसा पटला नव्हता. त्यांना अजूनही वाटत होतं की, हत्ती दोषी नाही, पण सिद्ध कसं करणार? एकीकडं हत्तीबद्दल त्याला दया येत होती, तर दुसरीकडं पुरावा नसल्यानं हात बांधले गेले होते. दोन मुद्द्यांबाबत त्यांच्या मनात शंका होती… पहिला म्हणजे हत्ती मांसाहारी प्राणी नाही. तो कशाला सशाला मारील? जरी हत्तीचं भांडण असलं-अगदी वंशपरंपरेनं भांडण असलं तरीही यापूर्वी कुणा हत्तीनं सशाला मारल्याचं ऐकिवात नाही. दुसरी गोष्ट आपण निरपराध आहोत हे सांगताना कोल्हा म्हणाला होता की, आपल्या जंगलातील हिंस्र प्राणी आपल्याच वनातील छोट्या प्राण्यांची सहसा शिकार करत नाहीत. वास्तविक पाहता हे. चुकीचं आहे. अजिबात शिकार करत नाहीत असं त्यानं म्हणायला हवं होतं. ज्याअर्थी तो ‘सहसा’ म्हणाला त्याअर्थी तो स्वतःच अधून मधून अशी ‘शिकार करत असला पाहिजे.
वाघोबाला राहून राहून वाटत होतं की, हत्ती निर्दोष आहे. गुहेकडं निघालेले वाघोबा परत माघारी वळले. सिंहमहाराजांकडं गेले. आपल्या मनातली शंका त्यांनी बोलून दाखवली…. याचा शोध घ्यायची परवानगी मागितली….
सिंहमहाराजांनीही थोडा विचार केला. वाघोबांचं म्हणणं त्यांना रास्त वाटलं. निरपराध प्राणी बळी जाऊ नये असाच त्यांचा पण कटाक्ष होता…. त्यांनी वाघोबाला परवानगी दिली वाघोबा आनंदानं हत्तीकडं निघाले.
गुहेत हत्ती खिन्न मनानं बसला होता. वाघोबानं त्याला समजावलं…. हत्तीनं कळवळून सांगितलं की, ‘मी खरंच दोषी नाही. सशाची किंकाळी ऐकून मी इकडे आलो.’ वाघोबानं आणखी खोदूनरखोदून विचारलं की, किंकाळीपूर्वी काही दिसलं का? हत्तीनं आठवायचा प्रयत्न केला… मग त्याला आठवलं की, तो जंगलातून त्या बाजूला जात असताना एक मोठा दगड गडगडत येत होता… थोड्या वेळानं सशाची किंकाळी ऐकू आली. तिकडे धावत गेलो तर ससा पडलेला. त्याला पाहतो तर वरून कोल्हा धावत येत होता… पण मला पाहताच तो चपापला आणि ‘तूच या सशाला मारलंस’ म्हणून आरडाओरड करू लागला…
वाघोबा तिथून उठले. ते सशाकडे गेले. त्याचं सांत्वन केलं. सांत्वन करायला हवं होतं. कारण इटुकला ससा आणि त्याचं कुटुंब सगळ्यांचंच लाडकं होतं… सशाशी बोलताबोलता वाघोबांना आणखी एक गोष्ट कळली… ससा म्हणे, ‘वाघोबा, माझा मित्र कोल्हा… अहो तीन दिवस उपाशी असूनही माझ्या मुलासाठी धावत की हो आला.’ कोल्हा तीन दिवस उपाशी होता हे तुला कोणी सांगितलं, असं विचारताच तो म्हणे, खुद्द कोल्होबांनीच सांगितलं! हे ऐकताच वाटेत कोल्होबाला चक्कर का आली होती ते वाघोबाला कळलं, सगळे पुरावे जमवून रात्री उशिरा ते आपल्या गुहेत गेले.
खटल्याचा निकाल ऐकायला सगळेजण उत्सुक होते. सिंहमहाराजांनी प्रधानजी वाघोबांकडे या खटल्याची सूत्रं दिली. वाघोबा निकाल द्यायला उभे राहिले. ते म्हणाले की, ‘काल बरीच मेहनत घेऊन रात्री उशिरापर्यंत या खुनाचे धागेदोरे हुडकण्याचा प्रयत्न केला… मला ते गवसले. कोल्होबा आता म्हातारे झाल्याने दुसऱ्या जंगलातील चपळ प्राण्यांची शिकार ते करू शकत नव्हते. गेले तीन दिवस ते उपाशी आहेत. पोटातली भूक माणसाला पाप करायला लावते. त्याप्रमाणं कोल्होबा डोंगरावर भक्ष्य मिळते का, ते पाहत असताना खाली त्यांना मित्राचा मुलगा छोटा ससा दिसला. त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. पवित्र मैत्रीची भावना ते विसरले. पोटातली भूक त्यांना काही सुचू देत नव्हती. सशाचीच शिकार करायचं त्यांनी ठरवलं. युक्त्या काय ?… त्यांच्याजवळ पुष्कळ होत्या. त्यातली त्यांनी एक वापरली. वरून एक मोठा दगड सशाच्या दिशेने ढकलला. दगड जसा गडगडत आला, तो पिलाला चिरडून पुढे गेला.तो दगड इथं आणण्यात आला आहे. सशाची किंकाळी ऐकून हत्ती धावत आला. पण ससा मेलेला होता. कोल्होबा डोंगरावरून धावत आले खरे पण समोर हत्तीला पाहताच आपलं बिंग फुटणार, असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी हत्तीवर आरोप घेऊन, हाका मारून इतर प्राण्यांना बोलावलं… म्हणजे खरा दोषी हा कोल्हाच आहे’ असं म्हणताच कोल्हा पळू लागला. पण वाघोबांनी झडप घालून त्याला पकडलं… थोडंसं दरडावताच त्यानं गुन्हा कबूल केला.
महाराजांसकट सर्वांनी वाघोबांच्या न्यायदानाची प्रशंसा केली आणि पुन्हा एकदा संपूर्ण वनाला वाघोबांची हुशारी कळली. अशा या हुशार प्रधानाच्या हुशारीवर समस्त पशु-पक्षी खूश होऊन त्याच्या न्यायाची स्तुती करत आपल्या घरी परतले.